बेरोजगारांसाठी येडेश्वरी सारखे आणखी युनिट उभे करू, त्यासाठी बजरंग बाप्पांना संसदेत पाठवा – सौरव सोनवणे

बजरंग सोनवणेंच्या प्रचारार्थ केज तालुक्यात कॉर्नर बैठका
केज
सुशिक्षित बेरोजगारांच्या हाताला काम उपलब्ध करून देण्यासाठी येडेश्वरी साखर कारखान्यासारखे इतर युनिट उभे करू. बेरोजगारांना स्वतःच्या पायावर उभे करू. त्यासाठी शेतकरी पुत्र बजरंग बाप्पा सोनवणे यांना मतदानरूपी आशीर्वाद देऊन संसदेत पाठवा. आवाहन युवानेते सौरव बजरंग सोनवणे यांनी केले. आम्ही आपले कधी ही विसरणार नाहीत अशी ग्वाही ही त्यांनी दिली.
राष्ट्रवादी शरद पवार गटाचे व इंडिया आघाडीचे उमेदवार बजरंग सोनवणे यांच्या प्रचारार्थ केज तालुक्यातील लव्हुरी, कोल्हेवाडी, तरनळी, साबला, धर्माळा या गावात कॉर्नर बैठका घेण्यात आल्या. यावेळी युवानेते सौरव सोनवणे हे बोलत होते. यावेळी शेकापचे भाई मोहन गुंड, मुन्ना चाळक, पिंटु मस्के, बप्पा डोंगरे बालाजी सोनवणे यांच्यासह तालुक्यातील प्रमुख कार्यकर्ते उपस्थित होते.
यावेळी भाई मोहन गुंड म्हणाले की, या निवडणुकीत सर्वसामान्य शेतकरी, कष्टकरी वर्गामध्ये भाजपविरोधी खूप मोठा रोष निर्माण झाला आहे. गेल्या दहा वर्षापासून फक्त भांडवलदार पोसण्याचे काम या भाजपकडून होताना दिसत आहे. मात्र सर्वसामान्य शेतकरी, कष्टकरी वर्गाला वेठीस धरले आहे. पीकविमा, अतिवृष्टी अनुदान, फळबागाचे नुकसान अशा अनेक प्रश्नावर भाजप उदासीन आहे. बीड जिल्ह्यात सर्वाधिक आत्महत्या झाल्या असून बीडच्या खासदाराने दहा वर्षात चक्र शब्द काढला नाही. असा आरोप करीत इंडिया आघाडीचे उमेदवार बजरंग सोनवणे यांची निवडणूक सर्वसामान्य माणसाने हाती घेतली असून त्यांचा विजय कोणी रोखू शकत नाही. असा विश्वास भाई मोहन गुंड यांनी व्यक्त केला.