डॉ बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्थेच्या समितीवर निवड

बीड (प्रतिनिधी):-
डॉ बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी) चे महासंचालक सुनील वारे यांच्या आदेशाने वस्ताद लहुजी साळवे मातंग समाज आयोग अभ्यास व कृती अहवाल समिती सदस्य पदी प्रा. रमेश लांडगे यांची निवड नुकतीच करण्यात आली आहे.
महाराष्ट्र शासनाने मातंग समाजाच्या विकासासाठी गठीत केलेल्या लहुजी साळवे मातंग समाज आयोगाने दिलेल्या 82 शिफारशी पैकी 68 शिफारशी या तत्त्वतः मान्य करण्यात आल्या आहेत. या शिफारशीची अंमलबजावणी शास्त्रशुद्ध पद्धतीने करण्याच्या उद्देशाने ही अभ्यास व कृती अहवाल समिती तयार करण्यात आली आहे. या समिती साठी तज्ञ सदस्य म्हणून कालिकादेवी महाविद्यालय शिरूर कासार येथील इंग्रजी विभागाचे सहाय्यक प्राध्यापक प्रा डॉ. रमेश लांडगे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. रमेश लांडगे यांनी मातंग समाजाचे सांस्कृतिक, सामाजिक आणि शैक्षणिक उद्बोधन व्हावे या उद्देशाने अण्णाभाऊ साठे राज्यस्तरीय साहित्य संमेलन, अण्णाभाऊ साठे यांच्या साहित्यावर आंतरराष्ट्रीय परिषदा आयोजित केल्या आहेत. कोविड काळात फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून महाराष्ट्रातील घराघरात अण्णाभाऊंचा विचार पोहोचविला. तसेच अण्णाभाऊ साठे यांची वैजयंता आणि चित्रा ही कादंबरी इंग्रजी भाषेत भाषांतरित केली आहे.
प्रा रमेश लांडगे एक अभ्यासू आणि सामाजिक जाणीव असणारे व्यक्तिमत्व म्हणून त्यांची ओळख आहे. त्यांच्या या निवडीमुळे समाजाच्या सर्व स्तरातून त्यांचे अभिनंदन होत आहे.