संतोष देशमुख हत्या प्रकरण;विशेष सरकारी वकील म्हणून अॅड. उज्ज्वल निकम यांची नियुक्ती!

मुंबई – सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात विशेष सरकारी वकील म्हणून उज्ज्वल निकम यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तर सहाय्यक विशेष सरकारी वकील म्हणून बाळासाहेब कोल्हे यांची नियुक्ती झाली आहे. याबाबतचे आदेश नुकतेच काढण्यात आले. या निर्णयामुळे मस्साजोगचे ग्रामस्थ, देशमुख कुटुंबिय आणि भाजप आमदार सुरेश धस यांनी केलेली आणखी मागणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मान्य केली आहे.
महाराष्ट्र शासनाने अॅड. उज्ज्वल निकम यांची विशेष सरकारी वकील (Special Public Prosecutor) म्हणून तर अॅड. बाळासाहेब कोल्हे यांची विशेष सरकारी वकील सहाय्यक (Assistant to Special Public Prosecutor) म्हणून नियुक्ती केली आहे. ही नियुक्ती बीड जिल्ह्यातील केज सत्र न्यायालयात सुरू असलेल्या गुन्ह्यांशी संबंधित आहे.राज्य शासनाने २५ फेब्रुवारी २०२५ रोजी जारी केलेल्या अधिसूचनेनुसार, अॅड. उज्ज्वल निकम आणि अॅड. बाळासाहेब कोल्हे हे सी. आर. क्रमांक ६३६/२०२४, ६३७/२०२४ आणि ६३८/२०२४ या प्रकरणांसाठी नेमण्यात आले आहेत. हे गुन्हे केज पोलीस ठाण्यात नोंद आहेत.या नियुक्तींसाठी दोन्ही वकिलांचे मानधन गृह विभागाकडून अदा केले जाईल. तसेच त्यांची सेवा महाराष्ट्र विधी अधिकारी (नियुक्ती, सेवा अटी आणि वेतन) नियम, १९८४ च्या अटींवर आधारित असेल. शासनाने कोणतेही कारण न देता या नियुक्तीला रद्द करण्याचा किंवा बदल करण्याचा अधिकार राखून ठेवला आहे.ही अधिसूचना महाराष्ट्र शासकीय राजपत्रात प्रसिद्ध केली जाणार असून, त्याची दोन प्रती विधी व न्याय विभागाला सादर करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.(वैशाली पी. बोरुडे, विभाग अधिकारी, विधी व न्याय विभाग, महाराष्ट्र शासन)