राजकीय
शरद पवार गटाचे बीड लोकसभेचे उमेदवार जाहीर !

बीड:- प्रतिनिधी
आगामी लोकभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शरद पवार गटाकडून लोकसभा उमेदवारांची दुसरी यादी जाहीर करण्यात आली. यामध्ये दोन उमेदवारांचा समावेश आहे. त्यानुसार बीडमधून बजरंग सोनवणे यांना शरद पवार गटाने उमेदवार जाहीर केले आहे.आज नव्याने दोन उमेदवारांची दुसरी यादी शरद पवार गटाने जाहीर केली आहे.
बीड लोकसभा मतदारसंघातून शरद पवार गटाकडून उमेदवारी मिळवण्यासाठी ज्योती मेटे आणि बजरंग सोनवणे हे दोघेजण इच्छूक होते. मात्र, बजरंग सोनवणे यांनी गेल्या निवडणुकीत प्रितम मुंडे यांना चांगली टक्कर दिली होती. ज्योती मेटे यांच्यापेक्षा बजरंग सोनवणे यांच्याकडे निवडणूक लढवण्यासाठी असलेली यंत्रणा आणि क्षमता हे निकष लक्षात घेता शरद पवार गटाने बजरंग सोनवणे यांना बीडमधून उमेदवारी दिली आहे. बीडमध्ये आता पंकजा मुंडे विरुद्ध बजरंग सोनवणे अशी लढत रंगेल.