वारजे भागात फुले विकणाऱ्या कुमारी मधुरा उभेला सद्गगुरू सेवा प्रतिष्ठान, पुणेचा अकरावी विज्ञान शाखेच्या शिक्षणासाठी मदतीचा हात

“पाठीवरती हात ठेवुनी फक्त लढ म्हणा…” प्रेरणादायक कहानी उच्च शिक्षणासाठी धडपडणाऱ्या मधुरा उभे या तरुणीची…
वारजे-माळवाडी येथील आदित्य गार्डन सिटी सोसायटीच्या बाहेर उदरनिर्वाहासाठी फुले विकणाऱ्या कविता उभे या भगिणीच्या द्वितीय कन्या मधुरा या युवतीला दहावीमध्ये ८८% मिळाले आणि तिच्या पुढील शिक्षणासाठी पुण्यातील सदगुरू सेवा प्रतिष्ठान संस्थेने आर्थिक मदतीचा हात दिला.
वारजे परिसरातील गोकुळनगर शेजारी पाडयावर ही युवती राहते. पोटाची खळगी भरण्यासाठी रोज पहाटे पहाटे उठून फुले, हार येऊन जवळपासच्या मंदिरांमध्ये आलेल्या भाविकांना ते विकते. या विक्रीतून आलेल्या पैशातून कसाबसा ती आणि तिच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करते. जिथे रोज हार फुले विकल्याशिवाय पोटंच भरत नाही. तिथे ती शिक्षण कशी पूर्ण करणार. त्यामुळे तिचे शिक्षण अर्धवटच राहू नये यासाठी हा अट्टाहास. तिला शिक्षणाची खूप आवड असूनही केवळ प्रतिकूल परिस्थितीमुळे शिक्षणाकरिता अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. हे आदित्य गार्डन सिटी मध्ये राहणाऱ्या सुरेश काकांनी आपल्या संस्थेला निदर्शनास आणून दिले आणि सदगुरू सेवा प्रतिष्ठानने युवतीला शिक्षणासाठी आर्थिक मदत करण्याचा निर्णय घेतला. २८,०००/- रुपये धनादेश सूपूर्द करताना मधुरा, तिची आई आणि सुरेश काका आदी उपस्थित होते. ज्या मुली किंवा स्त्रिया शिक्षणापासून वंचित आहेत, त्यांना मदत करण्यासाठी समाजामधून दातृत्व पुढे येण्याची गरज असल्याचे मत सद्गुरू सेवा प्रतिष्ठान संस्थेचे संस्थापक अध्यक्ष सचिन म्हसे यांनी यावेळी बोलताना व्यक्त केले. प्रशासकीय सेवेतील महिलांकडे बघून अनेक मुली घडतील. जेथे जेथे शिक्षणासाठी आर्थिक, साहित्यरूपी गरज असेल, तेथे आम्ही ती पोहोचविण्याचा प्रयत्न करणार असल्याचे सचिन म्हसे यांनी सांगितले. प्रतिकूल परिस्थितीत अनेक मुली शिक्षणासाठी प्रयत्न करीत आहेत. प्रत्यक्षात महिलांनी स्वकर्तृत्वावर पुढे येण्याची गरज असल्याचे सुरेश काळे काकांनी सांगितले.