उत्कृष्ट आंतरराष्ट्रीय चित्रपट ‘आरमंड’ तर, मराठीमध्ये ‘सांगळा’ची बाजी

‘पिफ’ च्या चित्रपट पारितोषिकांची घोषणा
| प्रतिनिधी | पुणे, दिनांक २० : तेविसाव्या पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात (पिफ) जागतिक चित्रपट स्पर्धेमध्ये ‘आरमंड’ या हाल्फदान उलमन तोंडेल यांनी दिग्दर्शित केलेल्या नॉर्वे येथील चित्रपटाला उत्कृष्ट चित्रपटाचे महाराष्ट्र शासनाचे ‘प्रभात’ उत्कृष्ट आंतरराष्ट्रीय चित्रपटाचे पारितोषिक मिळाले. तर संत तुकाराम उत्कृष्ट आंतरराष्ट्रीय मराठी चित्रपटाचे पारितोषिक ‘सांगळा’ या रावबा गजमल यांनी दिग्दर्शित केलेल्या चित्रपटाला मिळाले.
पुणे फिल्म फाऊडेशन, महाराष्ट्र शासनाचा सांस्कृतीक विभाग आणि दादासाहेब फाळके चित्रनगरी यांनी संयुक्तपणे आयोजित केलेल्या २३ व्या पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात (पिफ) समारोप समारंभात आज संध्याकाळी विविध पारितोषिकांची घोषणा करण्यात आली. यावेळी पुणे महापालिकेचे आयुक्त डॉ. राजेंद्र भोसले, दादासाहेब फाळके चित्रनगरीचे सहव्यवस्थापकीय संचालक डॉ. धनंजय सावळकर, महोत्सवाचे संचालक डॉ. जब्बार पटेल, पुणे फिल्म फाऊडेशनचे विश्वस्त सतिश आळेकर, अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंळाचे अध्यक्ष मेघराज राजेभोसले, आंतरराष्ट्रीय ज्यूरी, चित्रपट निवड समितीचे सदस्य उपस्थित होते.
नॉर्वे या देशातील ‘आरमंड’ या हाल्फदान उलमन तोंडेल यांनी दिग्दर्शित केलेल्या चित्रपटाला महाराष्ट्र शासनाचे १० लाख रुपयांचे ‘प्रभात’ उत्कृष्ट आंतरराष्ट्रीय चित्रपटाचे पारितोषिक मिळाले.
मराठी आंतरराष्ट्रीय चित्रपट स्पर्धेत ‘सांगळा’ या रावबा गजमल यांनी दिग्दर्शित केलेल्या चित्रपटाला महाराष्ट्र शासनाचे संत तुकाराम उत्कृष्ट आंतरराष्ट्रीय मराठी चित्रपटाचे ५ लाख रुपयांचे पारितोषिक मिळाले.
पुणे महापालिकेचे आयुक्त डॉ. राजेंद्र भोसले यांनी यावेळी पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवासाठी कार्यालयासाठी जागा देणार असल्याचे जाहीर केले. ते म्हणाले, पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवा(पिफ)साठी जे सहकार्य लागेल, ते आम्ही पुणे महापालिकेतर्फे करणार आहोत. ते म्हणाले, “‘पिफ’ हे कल्पनांचे आदानप्रदान करण्याचे उत्तम व्यासपीठ आहे. यामुळे ग्रामीण भागातील तरुणांना चित्रपट निर्मितीसाठी फायदा होईल. “
सावळकर म्हणाले, की महोत्सव हे केवळ चित्रपट दाखवण्याचे व्यासपीठ नाही तर कथा सांगण्याचा महोत्सव आहे. इथे भाषांचे बंधन नाही. संस्कृतीचे आदानप्रदान होण्याचे हे उत्तम ठिकाण आहे.” ते म्हणाले, “ चित्रपट क्षेत्रात वेगाने बदल होत आहेत. त्यामुळे यात काम करणाऱ्या लोकांनी सतत अपडेटेड असले पाहिजे. या उद्योगामधील कुशल मनुष्यबळाची गरज आहे. त्यासाठी शासन काही कोर्स चालवत आहे. चित्रपटांद्वारे राज्यामध्ये पर्यटन कसे वाढवता येईल, याचाही शासन विचार करत आहे.”
डॉ. जब्बार पटेल यांनी संपूर्ण महोत्सवाचा आढावा घेतला. त्यांनी सांगितले , की राज कपूर यांच्या जन्मशताब्दीनिमित्त शोमन राज कपूर ही यावर्षीच्या महोत्सवाची थीम होती. या महोत्सवात यावर्षी ८१ देशांतून आलेल्या चित्रपटांपैकी १५० चित्रपट दाखवण्यात आले. ३ चित्रपटांचे वर्ल्ड प्रिमियर, २० चित्रपटांचे भारतीय प्रिमियर झाले. अनेक कार्यशाळा झाल्या.
महोत्सवाचे आंतरराष्ट्रीय ज्यूरी मार्को बेकिस (चिली-इटालियन चित्रपट दिग्दर्शक आणि पटकथा लेखक), मार्गारिवा शिल (पोर्तुगीज चित्रपट दिग्दर्शक आणि शिक्षिका),पेट्री कोटविका (फिनिश चित्रपट दिग्दर्शक आणि पटकथा लेखक), तामिन्हे मिलानी (इराणी चित्रपट दिग्दर्शक), जॉर्जे स्टिचकोविच (सिनेमॅटोग्राफर सर्बिया), सुदथ महादिवुलवेवा (श्रीलंकन चित्रपट दिग्दर्शक), उर्वशी अर्चना (दक्षिण भारतीय अभिनेत्री), अनिरुद्ध रॉय चौधरी (भारतीय चित्रपट दिग्दर्शक) यावेळी उपस्थित होते.
ढोल ताशा आणि गणपतीची पालखी आणून कार्यक्रमाला सुरुवात झाली. एमआयटी एडिटी युनिव्हर्सिटी लोणी काळभोरच्या विद्यार्थ्यांनी नृत्य आणि सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले. श्रेया बुगडे आणि क्षितिश दाते यांनी सूत्रसंचालन केले.
” मराठी चित्रपट पारितोषिके “
- महाराष्ट्र सरकारचा “संत तुकाराम” सर्वोत्कृष्ट आंतरराष्ट्रीय मराठी चित्रपट पुरस्कार ५ लाख रुपयांचा, रावबा गजमल दिग्दर्शित आणि निर्मित ‘सांगळा’ या चित्रपटाला देण्यात आला.
- अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाचा सर्वोत्कृष्ट चित्रपट दिग्दर्शकाचा २५ हजार रुपयांचा पुरस्कार ‘स्नो फ्लॉवर’ या चित्रपटाचे दिग्दर्शक गजेंद्र अहिरे यांना जाहीर करण्यात आला.
- अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाचा सर्वोत्कृष्ट चित्रपट अभिनेता पुरस्कार २५,००० रुपयांच्या बक्षीस रकमेसह ‘सांगळा’ या चित्रपटासाठी अनिल दाभाडे यांना प्रदान करण्यात आला.
*अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ सर्वोत्कृष्ट अभिनेत्री पुरस्कार २५,००० रुपयांच्या बक्षीस रकमेसह ‘स्नो फ्लॉवर’ या चित्रपटासाठी छाया कदम यांना जाहीर करण्यात आला.
- अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ सर्वोत्कृष्ट छायाचित्रकार पुरस्कार, २५,००० रुपयांच्या बक्षीस रकमेसह अमेय वसंत चव्हाण यांना ‘रावसाहेब’ या चित्रपटासाठी जाहीर करण्यात आला.
- ‘निर्जली’ या चित्रपटासाठी पदार्पण करणारी अभिनेत्री स्वाती सदाशिव कडू यांना ज्युरी स्पेशल मेंशन प्रमाणपत्र देण्यात आले.
- ‘गिरण’ या चित्रपटासाठी पदार्पण करणारी अभिनेत्री भक्ती घोगरे यांना ज्युरी स्पेशल मेंशन प्रमाणपत्र देण्यात आले.
” आंतरराष्ट्रीय चित्रपट पुरस्कार “
- महाराष्ट्र सरकारचा “प्रभात” सर्वोत्कृष्ट आंतरराष्ट्रीय चित्रपट पुरस्कार – नॉर्वे, नेदरलँड येथील ‘आरमंड’ या चित्रपटाला १० लाख रुपयांचा पुरस्कार – दिग्दर्शक हाल्फदान उलमन टोंडेल दिग्दर्शित आणि निर्मात्या अँड्रिया बेरेंट्सन ओटट्मार यांना हा पुरस्कार प्रत्येकी ५ लाख रुपये असं सम प्रमाणात विभागून देण्यात आला.
- महाराष्ट्र सरकारचा ५ लाख रुपयांचा ‘प्रभात’ सर्वोत्कृष्ट आंतरराष्ट्रीय चित्रपट दिग्दर्शक पुरस्कार दिग्दर्शिका नाओमी जाये यांना ‘डार्केस्ट मिरियम’ या चित्रपटासाठी देण्यात आला.
- ज्युरी स्पेशल मेन्शन पुरस्कार – देआ कुलुम्बेगाश्विली दिग्दर्शित आणि लान अमौयुआल आणि डेव्हिड झेरॅट निर्मित ‘एप्रिल’ या चित्रपटाला देण्यात आला.
- ज्युरी स्पेशल मेन्शन पुरस्कार – महदी फ्लेईफेल दिग्दर्शित आणि महदी फ्लेईफेल आणि जेफ आर्बोर्न निर्मित “टू अ लँड अननोन” या चित्रपटाला देण्यात आला.
- मारीया प्रोचाझस्का या पोलिश चित्रपट निर्मातीने दिलेल्या निधीतून दिले जाणारे खास पारितोषिक एफटीआयचा विद्यार्थी मनकाप नोकवोहम याला देण्यात आले.