महावितरणकडे तक्रार व पाठपुरावा करुन माहिती अधिकार समितीच्या अशोक कोकणे यांनी दिला महिलेला न्याय

तळवडे येथील विद्युत डीपीच्या उघड्या तारेच्या प्रवाहावर पाय पडुन महिला गंभीर जखमी झाल्याची घटना
महावितरणकडे तक्रार व पाठपुरावा करत जखमी महिलेला मिळवुन दिली लाखो रुपयांची नुकसानभरपाई
पिंपरी दि.१९ (प्रतिनिधी) – जागृत नागरिक महासंघ माहिती अधिकार प्रचार प्रसार समितीचे शहरप्रमुख अशोक कोकणे यांच्या तक्रारीमुळे व सक्षम पाठपुराव्यामुळे तळवडे येथील विद्युत डीपीच्या उघड्या वायरीवर पाय पडून ६० टक्के भाजलेल्या कष्टकरी महिलेला न्याय मिळाला, महावितरणच्या निष्काळजीपणामुळे विद्युत झटक्याने गंभीर जखमी झालेल्या महिलेला तब्बल एक लाख तीस हजार रुपये एवढी नुकसान भरपाई मिळवुन देण्यात कोकणे यांना यश मिळालं आहे.
दि.०३/०९/२०२० रोजी सुनंदा भास्कर साळुंखे (राहणार- सेक्टर २२निगडी) या सोनवणे वस्ती रोड, तळवडे याठिकाणी असलेल्या विद्युत डीपीच्या उघड्या विद्युत प्रवाहाच्या तारेवर पाय पडुन जोरात विद्युत झटका लागण्याने मोठ्या प्रमाणावर भाजल्या गेल्या, शरीराचा खुप भाग हा ६० ते ६५ टक्क्यापेक्षा जास्त भाजला गेला, काही लोकांच्या मदतीने त्यांना उपचारासाठी खाजगी रुग्णालयात दाखल तर करण्यात आलं परंतु आर्थिक परिस्थिती हलाखीची असल्याने तेथील उपचार परवडत नव्हते, कुटुंबातील कर्ता असणारी महिलाच या विद्युत झटक्याने रुग्णालयात जीवनाशी झुंज देत असताना सर्व आर्थिक समीकरणे जुळणारी नव्हती, ही माहिती जेव्हा माहिती अधिकाराचे सज्ञान असलेल्या अशोक कोकणे यांना माहीत झाल्यावर त्यांनी याची रीतसर पोलिस चौकीत व महावितरण कंपनीकडे तक्रार दाखल केली पण प्रशासन आपली चुक मान्य करत नव्हतं, माहिती अधिकार कायद्याचे ज्ञान असल्याने व अभ्यासु पध्दतीने भुमिका मांडत प्रचंड पाठपुरावा केल्याने अधिकारी व प्रशासनाला त्यांची चुक लक्षात आणुन दिली, जखमी झालेल्या भगिनीला जास्तीत जास्त नुकसानभरपाई मिळाली पाहिजे यासाठी अत्यंत कष्ट घेऊन प्रशासनाकडे तब्बल दोन ते अडीच वर्ष पाठपुरावा केल्याने आज सदर महिलेला लाखो रुपयांची नुकसानभरपाई मिळवुन देण्यात व पिडीत महिलेला न्याय मिळवुन देण्यात यश आल्याची भावना अशोक कोकणे यांनी व्यक्त केली.
गणेशखिंड सर्कलच्या महावितरण कार्यालयाने नुकतेच एका पत्राद्वारे नुकसानभरपाई देण्यासंदर्भात माहिती दिली व आजरोजी त्यांच्या बँक खात्यावर ही रक्कम जमा केली आहे त्यामुळे पीडित असणाऱ्या सुनंदा भास्कर साळुंखे यांनी प्रशासनाचे व न्याय मिळवुन देणाऱ्या अशोक कोकणे यांचे मनापासुन आभार व समाधान व्यक्त केले आहे.
भोसरी विभागात हा नुकसानभरपाई वाटपाचा कार्यक्रम पार पडला, महावितरण भोसरी विभागाचे अतिरिक्त कार्यकारी अभियंता महेश देशमुख, सहाय्यक अभियंता ज्योत्स्ना बोरकर-पवार, यांच्या शुभहस्ते सुनंदा साळुंखे यांना धनादेश देण्यात आला त्यावेळी जागरूक नागरिक महासंघाचे अध्यक्ष नितीन शशिकांत यादव, पिंपरी चिंचवड शहर प्रमुख अशोक कोकणे, उपाध्यक्ष राजेश विश्वकर्मा, सचिव उमेश सनस, राजू डोगिवाल, मच्छिंद्र कदम, प्रामुख्याने उपस्थित होते.
