मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजनेंतर्गत कामे प्रगतीपथावर

केज- वार्ताहर
शेतीला केवळ रात्री वीज पुरवठा होत असल्याने हवालदिल झालेल्या केज विधानसभा मतदार संघातील शेतकऱ्यांना लवकरच दिलासा मिळणार आहे. मतदार संघात मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजनेंतर्गत कामे प्रगतीपथावर असून त्यामुळे शेती पंपासाठी दिवसाही वीजपुरवठा करणे शक्य होणार आहे. शेतकऱ्यांच्या हिताच्या दृष्टीने अधिकाधिक उपकेंद्रांचा समावेश या योजनेत करण्यासाठी आ. नमिता मुंदडा यांनी नियमित पाठपुरावा सुरु ठेवला होता.
सध्या शेतीला रात्री वीज पुरवठा होत असल्याने शेतकऱ्यांना अनंत अडचणींना तोंड द्यावे लागते. या पार्श्वभूमीवर, शेतीला दिवसा किमान आठ तास वीज मिळावी या हेतूने आ. नमिता मुंदडा यांनी मतदार संघातील कृषीबहुल भागातील अकरा विद्युत उपकेंद्राचा मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजनेत समावेश करून घेतला. या योजनेतील कामे आता प्रगतीपथावर सरू आहेत. त्यापैकी मस्साजोग, विडा, बनसारोळा, माळेगाव, राजेगाव, बाघुळगाव (सर्व ता.केज) या 33 के.ही उपकेंद्रात अतिरिक्त ५ एमव्ही चे रोहित्र बसविले जाणार असून सौरउर्जेचा वापर करून शेतीसाठी दिवसा वीज पुरवठा करण्यात येईल. योजनेत मंजूर झालेल्या उर्वरित 33 के.व्ही. उपक्रकेंद्रातील पॉवर ट्रॉन्सफोर्मर बसविण्याचे काम दोन महिन्यात पूर्ण होईल. त्यानंतर सौर पॅनलचे काम करण्यात येईल. यासोबतच आपेगाव, कुंबेफळ (ता. अंबाजोगाई), आडस, केज, धनेगाव (ता. केज) या 33 के.व्ही. उपकेंद्रातील दुरूस्ती कामे करण्यात येणार आहेत. सदरील कामे पूर्णत्वास गेल्यानंतर शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे.
यानिमित्ताने शेतकऱ्यांची मोठी अडचण दूर करून त्यांना दिलासा दिल्याबद्दल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री तथा उर्जामंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, आ. पंकजाताई मुंडे, भाजप नेत्या प्रीतमताई मुंडे यांचे आ. नमिता मुंदडा यांनी आभार मानले आहेत.