मातंग समाजाला स्वतंत्र आरक्षण मिळणे काळाची गरज- प्रा. डॉ. मच्छिंद्र सकटे

मातंग समाजाला स्वतंत्र आरक्षण मिळणे काळाची गरज- प्रा. डॉ. मच्छिंद्र सकटे
शाहिद संजय ताकतोडे यांनी पाहिलेले स्वप्न पूर्ण करण्यासाठी दलीत महासंघ तीव्र लढा उभारणार
केज – दत्तात्रय मुजमुले
मातंग समाजाच्या स्वतंत्र आरक्षणाचा विषय अनेक वर्षापासून प्रलंबित आहे.मातंग समाजाच्या आरक्षणासाठी संजय ताकतोडे यांनी जलसमाधी घेत शाहिद झाले परंतु शासन दरबारी तेवढ्या पुरता विषय हाताळला गेला आणि आरक्षणाचा मुद्दा पाठीमागे पडत गेला.
मातंग समाजाला स्वतंत्र आरक्षण मिळावे यासाठी जलसमाधी घेणारे शाहिद संजय ताकतोडे यांचा पुण्यस्मरणाचा कार्यक्रम त्यांच्या गावी साळेगाव येथे पार पडला.त्यांना अभिवादन करण्यासाठी दलीत महासंघाचे संस्थापक अध्यक्ष प्रा. डॉ. मच्छिंद्र सकटे हे आले असता त्यांनी केज येथे पत्रकारांशी मातंग समाजाच्या आरक्षणाविषयी संवाद साधला.शाहिद संजय ताकतोडे यांनी समाजासाठी दिलेले बलिदान समाज व्यर्थ जाऊ देणार नाही त्यांनी पाहिलेलं स्वप्न पूर्ण करण्यासाठी व शाहिद संजय ताकतोडे यांना न्याय मिळवून देण्यासाठी दलीत महासंघ रस्त्यावर उतरणार असल्याचे त्यांनी बोलताना सांगितले.डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी ज्या उद्देशाने आरक्षण दिले होते त्यासाठी सर्वांना आरक्षणाचा लाभ मिळावा,नव्या पिढीतील मुलांना जर संधी हवी असेल तर यासाठी मातंग समाजाला स्वतंत्र आरक्षण मिळणे ही काळाची गरज असल्याचे प्रा डॉ. सकटे यांनी सांगितले.शाहिद संजय ताकतोडे यांच्या कुटुंबियांना शासनाने मदत करायला हवी होती त्यांच्या कुटुंबातील एकाला सरकारी नौकरी मध्ये घ्यायला पाहिजे होते,पण मराठा आरक्षणासाठी बलिदान देणाऱ्यांना तात्काळ मदत मिळते आणि मातंग समाजासाठी ज्यांनी बलिदान दिलं त्यांचं काय? शासन जात पाहून मदत करत का? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.शासनाच्या वतीने साळेगाव येथे त्यांच्या गावी शाहिद संजय ताकतोडे यांचे स्मारक उभारावे व शासनाने स्मारक न उभारल्यास समाजाच्या वतीने आम्ही त्यांचं स्मारक उभा करू असे त्यांनी सांगितले.
शाहिद संजय ताकतोडे यांनी पाहिलेले स्वप्न पूर्ण करण्यासाठी आणि मातंग समाजाला आरक्षण मिळवून देण्यासाठी, मुलांच्या भविष्यासाठी दलीत महासंघाच्या व बहुजन समता पार्टीच्या वतीने लढा तीव्र करणार असल्याचा संकल्प केला असल्याचे प्रा.डॉ. मच्छिंद्र सकटे यांनी पत्रकारांना बोलताना सांगितले.यावेळी दलीत महासंघाचे जिल्हाध्यक्ष बापूराव उदारे व केज,अंबाजोगाई येथील दलीत महासंघाचे कार्यकर्ते उपस्थित होते.