सातारा येथील बिझनेस कॉन्फरन्समध्ये पिंपरीतून शेकडो तरुण सहभागी होणार

संभाजी ब्रिगेडच्या पुढाकाराने नियोजन
(पिंपरी)मराठा उद्योजक घडविण्यासाठी संभाजी ब्रिगेड प्रयत्नशील असते. संघटनेच्या वतीने सातारा येथे बिझनेस कॉन्फरन्सचे आयोजन करण्यात आले आहे. या मध्ये पिंपरी – चिंचवड शहरातून मराठा तरुण सहभागी होणार असल्याची माहिती संभाजी ब्रिगेड पिंपरी चिंचवडचे शहराध्यक्ष सतीश काळे यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली. काळे यांनी दिलेल्या प्रसिद्धीपत्रकात नमूद केले आहे की, मराठा समाजातील तरुण बांधवांना नोकरी, व्यवसायासाठी संभाजी ब्रिगेड प्रोत्साहित करत असते. संघटनेच्या वतीने ७५० मराठा समाजातील तरुणांना विदेशात नोकरीसाठी पाठविण्यात आले आहे. तरुणांचे आर्थिक सक्षमीकरण करणे हे संघटनेचे मूळ उद्दीष्ठे आहे. समाजातील सुशिक्षित व कौशल्यप्राप्त गरजू तरुणांना व्यवसायासाठी लागणारे मार्गदर्शन व सहकार्य केले जाते. परदेशातील रोजगाराच्या विविध संधींची माहिती दिली जाते. अहद ऑस्ट्रेलिया तहद कॅनडा अवघा मुलुख आपला या फेसबुक पेजच्या माध्यमातून मराठा तरुणांना रोजगार देण्यासाठी सहकार्य केले जात आहे. संघटनेच्या माध्यमातून दर महा विविध जिल्ह्यात बिझनेस कॉन्फरन्सचे आयोजन केले जाते. या मध्ये नवीन उद्योगांची माहिती, बँकाकडून कर्ज कसे उपलब्ध करावे, शासकीय अनुदान कसे मिळवावे या विषयी मार्गदर्शन केले जाते. सध्यस्थितीत बाजारपेठेतील स्थिती या विषयी मार्गदर्शन करण्यात येते. नुकतेच सातारा येथे बिझनेस कॉन्फरन्सचे आयोजन करण्यात आले आहे. या मध्ये पिंपरी चिंचवड शहरातील तरुणांना पाठविण्यात येणार आहे. शहरात तरुण उद्योजक घडावेत यासाठी संघटना प्रयत्नशील आहे. या कॉन्फरन्समध्ये सहभागी होण्याचे आवाहन शहराध्यक्ष सतीश काळे यांनी तरुणांना केले आहे.