बनसारोळा प्राथमिक आरोग्य केंद्रास ग्रामीण रुग्णालयाचा दर्जा

केज :- प्रतिनिधी
तालुक्यातील आडस, विडा पाठोपाठ बनसारोळा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रास देखील ग्रामीण रुग्णालयाचा दर्जा देण्यात येत असल्याचे राज्य शासनाने जाहीर केले आहे. केज विधानसभा मतदार संघाच्या आमदार नमिता मुंदडा यांनी या तिन्ही ठिकाणी ग्रामीण रुग्णालय सुरु करू अशी ग्वाही दिली होती. आ. मुंदडा यांनी दिलेला शब्द प्रयत्नपूर्वक खरा करून दाखवल्याने ग्रामस्थांतून समाधान व्यक्त होत आहे.
बनसारोळा हे केज तालुक्यातील महत्वाचे गाव आहे. तालुक्यातील ग्रामीण भागातील हे महत्वाचे शैक्षणिक केंद्र देखील आहे. तसेच मोठ्या बाजारपेठेमुळे आजूबाजूची लहानसहान सर्व खेडेगावातील लोकांची वर्दळ बनसारोळा येथे असते. आरोग्यसेवेच्या दृष्टीने येथे प्राथमिक आरोग्य केंद्र असून त्या ठिकाणी दररोज कमालीची गर्दी असते. वाढत्या लोकसंख्येच्या मानाने हे प्राथमिक आरोग्य केंद्र सुविधा पुरविण्यास असमर्थ ठरू लागले होते. आजारी व अपघातग्रस्त व्यक्तींना दूरच्या रुग्णालयात घेऊन जावे असल्याने अनेक रुग्णांच्या जीवावर बेतले आहे. त्यामुळे या भागासाठी ग्रामीण रुग्णालयाची नितांत आवश्यकता होती. हि बाब लक्षात घेत आ. नमिता मुंदडा यांनी मागील चार वर्षापासून बनसारोळा प्राथमिक आरोग्य केंद्राचे श्रेणीवर्धन करण्याची मागणी राज्य शासनाकडे करून त्यासाठी पाठपुरावा सुरु ठेवला होता. अखेर त्यांच्या प्रयत्नांना यश आले असून राज्य शासनाने विडा येथील प्राथमिक आरोग्य केंद्राचा दर्जावाढ करण्याचा निर्णय घेतला असून लवकरच या ठिकाणी आता तीस खाटांचे ग्रामीण रुग्णालय होणार आहे. त्यामुळे बनसारोळा आणि आजूबाजूच्या ग्रामीण भागाला चांगली आरोग्यसेवा मिळणे शक्य होणार आहे.
याबद्दल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, आरोग्यमंत्री तानाजी सावंत, भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजाताई मुंडे, बीडच्या खासदार प्रीतमताई मुंडे यांचे आ. नमिता मुंदडा यांनी आभार मानले आहेत.